
वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला; सागरी पोलीस दल घटनास्थळी दाखल
देवगड : प्रतिनिधी
देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात घडलेल्या या घटनेमुळे नौकेवरील खलाशांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, आजूबाजूला मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी तत्परतेने मदत केल्याने नौकेवरील सर्व २१ खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीची ‘भगवती कृपा’ (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-1614) ही नौका देवगड समुद्रात मासेमारी करत असताना इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे नौकेला आग लागली. समुद्रात नौकेला आग लागल्याचे लक्षात येताच खलाशांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी नौकेवरील सर्व २१ खलाशांना सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ‘एस सिंधुदुर्ग-४’ या वेगवान नौकेच्या सहाय्याने सागरी पोलीस दलाचे पथक पाण्याचा पंप घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सागरी पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तांडेल, ए. अरुण, एएसआय धुरी आणि एएसआय चंदन शिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आगीमुळे नुकसान झालेली नौका देवगड बंदरात आणण्यासाठी स्थानिक मच्छीमारांचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळताच मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे, सागर सुरक्षा रक्षक योगेश फाटक तसेच स्थानिक मच्छीमार देवगड बंदर येथे दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा अग्निशामक बंबही बंदर परिसरात दाखल झाला होता.









