
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
टंचाई काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या कृती गटाची बैठक
सिंधुदुर्गनगरी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे तांत्रिक व प्रशासकीय नियोजन काटेकोरपणे करावे. बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे बळकटीकरण, गाळ काढणे आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी यासह सर्व आवश्यक उपाययोजना संबंधित विभागांनी समन्वयाने व कालमर्यादेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
टंचाई काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती गटाची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) घेण्यात आली. यावेळी संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा आढावा, आवश्यक दुरुस्तीची कामे, पाणीपुरवठा योजनांचे नियोजन आणि विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने लघुपाटबंधारे व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घ्यावीत. आवश्यक दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला त्वरित सादर करून ही कामे पुढील एक ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. पाणीपुरवठा विभागाने विंधन विहिरींचे जलस्रोत बळकट करणे, नवीन बोअरवेल घेणे आणि त्यासाठी आवश्यक कामांचे परिमाण तयार करून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांतील अन्य ३३ गावांसाठी पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार करावा. विजयदुर्ग-मालवण-तेंडोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करावी. मृद व जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता प्राप्त कामे तातडीने पूर्ण करावीत. अन्य कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करून बंधारे, नाले व ओढ्यांमधील गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जलसंपदा विभागाने धामापूर तलावाच्या दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही करून स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे. तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाई कृती गटाची दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांचा आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच लघुपाटबंधारे विभाग, ओरोस येथील कार्यकारी अभियंता तथा कृती गटाचे सदस्य सचिव उपस्थित होते.









