ठळक घडामोडी

आचरा समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या मुंबईच्या पर्यटकाला जीवदान; दोन मरीन होमगार्डचे धाडस!

मालवण : महेश कदम
      आचरा समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागलेल्या मुंबई येथील २५ वर्षीय पर्यटकाला मरीन होमगार्डनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचवले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब या दोघांनी समुद्राच्या जोरदार प्रवाहात धाडसाने बचावकार्य करत पर्यटकाचे प्राण वाचवले. त्यांच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.
      मुंबई येथील एक कुटुंब आचरा येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. हे कुटुंब आचरा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले असताना, त्यातील २५ वर्षीय मोहम्मद खान हे समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरले. त्यावेळी भरती सुरू असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरड केली.
     कुटुंबीयांचा आवाज ऐकताच मरीन होमगार्ड नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली. पाण्याचा प्रवाह जोरदार असतानाही त्यांनी धाडसाने बचावकार्य सुरू केले आणि मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढले. दोन्ही मरीन होमगार्डनी वेळीच मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
     या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह तुकाराम पडवळ, मीनाक्षी देसाई, हेमंत पेडणेकर, विशाल वैजलं, दिगंबर घाडीगावकर, मनोज पुजारे, सावंत तसेच ग्रामस्थ राजन गावंकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
     दरम्यान, भरतीच्या वेळी समुद्रातील पाण्याचा प्रवाह आणि लाटांची तीव्रता यांचा अंदाज घेणे कठीण असते. त्यामुळे
पर्यटकांनी समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले.

error: Content is protected !!