ठळक घडामोडी

मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव – वैभव नाईकांचा गंभीर आरोप!

विकासकामांच्या निविदांची मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी चौकशी करण्याची वैभव नाईक यांची मागणी

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक हस्तक्षेप करत असून, आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी इतर ठेकेदारांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. मागील दोन वर्षांतील विकासकामांच्या निविदांची चौकशी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांनी करावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.
        वैभव नाईक म्हणाले की, गेली २ वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हापरिषद या विभागातील विकास कामे आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला मिळाली पाहिजेत आणि त्यांच्याकडून कमिशन मिळाले पाहिजे यासाठी राणे इतर ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. अशी अनेक कामे आहेत ज्यामध्ये ठेकेदारांनी स्पर्धात्मक पद्धतीने कमी टक्के दराने कामांची निविदा भरली होती. त्यात शासनाचाच फायदा होणार होता. परंतु ते मर्जितले ठेकेदार नसल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्या ठेकेदारांच्या कागपत्रांमध्ये त्रुटी काढून त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. कमी टक्के दराच्या निविदा नाकारत शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाचेच नुकसान करून त्या कामांच्या फेरनिविदा काढल्या. प्रत्येक काम आपल्याच ठेकेदाराला मिळाले पाहिजे मग त्यात शासनाचे नुकसान झाले तरी चालेल अशी भूमिका आ. राणेंची आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात स्पर्धात्मक पद्धतीने न झालेल्या सर्व कामांची चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांनी करावी अशी मागणी माजी आ. वैभव नाईक यांनी केली आहे.
        स्पर्धात्मक पद्धतीने विकास कामे व्हावीत यासाठी शासनाने विकास कामांची निविदा काढण्याची पद्धत अंमलात आणली. त्यामध्ये कमी टक्के दराने ज्या ठेकेदारांनी निविदा भरली त्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांच्याकडून डिपॉझिटची रक्कम भरून घेण्याची सक्ती शासनाने केली आहे. त्याचबरोबर कमी टक्के दराने निविदा भरली असली तरी अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम करून घेणे ही जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे आणि अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे.जर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी  संगनमत करून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतील, ठेकेदारांवर दबाव आणत असतील तर कामांची निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने होणार नाही.आणि असेच होणार असेल तर विकास कामांच्या निविदा काढू नका तुम्हाला वाटेल त्या ठेकेदाराला काम देऊन कमिशन घ्या असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.
          ते पुढे म्हणाले, निलेश राणेंनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.निलेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक त्यांच्या मार्जितल्या ठेकेदारांना कामे मॅनेज करून देत आहेत आणि त्यातून ते कमिशन लाटत आहेत.आधी घेतलेली कामे अर्धवट टाकणाऱ्या ठेकेदारांना देखील पुन्हा नवीन कामे मॅनेज करून देण्यात आली आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याची सखोल चौकशी करून जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

error: Content is protected !!