
वैभव नाईक यांच्याकडून व्हायरल ‘त्या’ पत्राचा अर्थ त्यांनी आपल्या सोयीनुसार लावू नये
माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकरांचा माजी आम. वैभव नाईक यांच्यावर पलटवार
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावण्यापेक्षा त्यामागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. विकासकामांचा दर्जा राखणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. दर्जेदार कामांसाठी आग्रही असलेल्या आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा विपर्यास करू नये, असे प्रत्युत्तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना दिले आहे.
वैभव नाईक यांनी सोशल मिडियावर आमदार निलेश राणे यांचे पत्र प्रसारित करून आपल्या मर्जीतील लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र, या पत्रात दर्जेदार कामे व्हावीत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे दिसून येते, असे काका कुडाळकर यांनी म्हटले आहे.
कुडाळ तहसीलदार कार्यालयाची इमारत निलेश राणे खासदार असताना त्यांच्या निधीतून बांधण्यात आली होती. त्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळात या इमारतीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी कोणताही खर्च केला नाही, असा आरोप कुडाळकर यांनी केला. तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेली ही इमारत नादुरुस्त आणि गळकी झाली होती. तिचे सुशोभीकरण करून ती वापरण्यायोग्य करण्यासाठी गेल्या वर्षभरात आमदार निलेश राणे यांनी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच सेतू सुविधा केंद्रालाही मंजुरी दिली असून, त्यामुळे शासकीय कामांसाठी तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दर्जेदार कामांसाठीच पत्र; ठेकेदार बदलण्याचा उल्लेख नाही
आमदार निलेश राणे यांच्या सहायकाने दिलेल्या पत्रात विकासकामांचा दर्जा राखण्यासह संबंधित सोसायटीच्या एकूण कारभाराचा विचार करण्यात आला आहे. मात्र, अन्य कोणत्याही ठेकेदाराला किंवा सोसायटीला काम देण्याचा उल्लेख या पत्रात नाही. त्यामुळे पत्राचा विपर्यास करून आरोप करण्याऐवजी विकासकामांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कुडाळकर यांनी केले.
वैभव नाईक यांच्या कार्यकाळावरही टीका
दुसऱ्यांवर आरोप करण्याऐवजी वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांचा विचार करावा. त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूरच्या ठेकेदारांना दिलेल्या कथित प्राधान्यामुळे काही विकासकामांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले, अशी टीका कुडाळकर यांनी केली. स्वतःच्या कार्यकाळात विकासकामे दर्जेदार केली असती, तर जनतेने त्यांना नाकारले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेने आमदार निलेश राणे यांच्यावर विश्वास दाखवला असून, त्या विश्वासाचा आदर करून ते मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहेत. हा निधी जनतेच्या हितासाठी आणि दर्जेदार विकासकामांसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होणार असून, त्याचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठीच केला जाईल. त्यामुळे व्हायरल पत्रावरून राजकीय आरोप करण्यापेक्षा विकासकामांचा दर्जा आणि त्यातून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा विचार करावा, असे काका कुडाळकर यांनी स्पष्ट केले.









