
वेळेचे महत्त्व आणि शिस्तीचा मंत्र; माजी सैनिकांनी दिली उपस्थितांना प्रेरणा
सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार; जलतारा योजनेवरही मार्गदर्शन
कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवारी पंचायत समिती सभागृहात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते विजय नाईक, रामचंद्र जगताप, चंद्रशेखर जोशी आणि सुनील सुर्वे या माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांनी सैन्यातील सेवाकाळातील अनुभव कथन केले. जीवनात वेळेचे काटेकोर पालन, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारी यांना अनन्यसाधारण महत्त्व असून, या मूल्यांचा दैनंदिन जीवनात अंगीकार केल्यास कार्यक्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक गवस, प्रशासन अधिकारी मृणाल कार्लेकर, सी. डी. परब, डोईफोडे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचवेळी पंचायत समितीच्या वतीने जलतारा योजनेबाबत मार्गदर्शन कार्यक्रमही घेण्यात आला.









