
मृतदेहाजवळ दुचाकी, दारूच्या बाटल्या अन् रक्ताचे डाग; मालवण पोलिसांकडून तपास सुरू
मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)
मालवण तालुक्यातील रेवंडी येथील तांडेलवाडी सडा परिसरात श्रीधर नरे (वय ३५, रा. मिठबांव नरेवाडी, ता. देवगड) या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. तो मालवणमध्ये एसटी बसस्थानकात सफाई कामगार म्हणून काम करत होता.
आज सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ विजय कांबळी हे मॉर्निग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रेवंडी तांडेलवाडी सडा परिसरामध्ये एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस पाटील शरवीन कांबळी यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटीलांनी त्वरित मालवण पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, जनार्दन रेवंडकर व त्यांचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता काही संशयास्पद बाबी समोर आल्या. घटनास्थळाजवळ एक दुचाकी, दारूच्या बाटल्या आणि काही ठिकाणी रक्ताचे डागही निदर्शनास आले. दरम्यान, काटेरी झाड्यांमुळे रक्त सांडले असल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवला जात आहे.
पोलिसांनी तातडीने पुढील तपासासाठी श्वान पथक, न्यायवैद्यक पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळी सापडलेली गाडी, बँग आणि श्रीधर नरे यांचे दोन्ही मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला.
प्राथमिक तपासानुसार हा मारहाणीचा प्रकार नसल्याचे समोर येत असून, या प्रकरणी मालवण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.









