ठळक घडामोडी

हुमरमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात!

महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवांचा ग्रामस्थांना लाभ

कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांची उपस्थिती

कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत मडगाव महसूल मंडळातील हुमरमळा (वालावल), ता. कुडाळ येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराला मडगाव मंडळातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
      सदर शिबिर उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी तहसीलदार श्री. सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू,  अर्चना बंगे, प्रियांका जळवी, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी श्वेता दळवी, अतुल बंगे, हुमरमळा सरपंच अमृत देसाई, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, सर्व ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसेच महसूल सेवक उपस्थित होते.
     या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, वय व अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, सातबारा व आठ-अ उतारे, फेरफार नोंदी, विविध महसूल अभिलेखांशी संबंधित सेवा, संजय गांधी विषयक प्रकरणे, पुरवठा विषयक प्रकरणे,   SIR 2026,  आणि नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारींचे निराकरण यांसारख्या सेवांसाठी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच इतर शासकीय विभागांमार्फत त्यांच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि योजनांच्या लाभासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
      सदर ‘सेवा संकल्प अभियान’ शिबिरात  १९३ शासकीय लाभांचे यशस्वी वितरण करण्यात आले. शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे, शासकीय कामकाज सुलभ करणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना विविध कार्यालयांत वारंवार जाण्याची आवश्यकता कमी करून एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

error: Content is protected !!