
पाणी अडवा, पाणी जिरवा! पडवेतील अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थांची एकजूट
जलसंधारणाच्या कार्यात अंगणवाडीचा सहभाग; पडवे येथे वन बंधारा उपक्रम उत्साहात
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेऊन अंगणवाडी पडवे येथे ‘वन बंधारा’ उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमात अंगणवाडी कर्मचारी, ग्रामस्थ, पालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी बीट कसालच्या पर्यवेक्षिका राखी राणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावाच्या प्रभारी सरपंच, आशा सेविका शितल परब, अंगणवाडी सेविका दिप्ती बोभाटे, मदतनीस अश्विन चव्हाण यांच्यासह उपस्थित ग्रामस्थ, अंगणवाडी माता आणि पालकांनी सहकार्य केले.
सर्वांच्या एकजुटीने, नियोजनबद्ध प्रयत्नांनी आणि मेहनतीने हा उपक्रम यशस्वी झाला. जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला.









