ठळक घडामोडी

सावंतवाडीत तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोलवर वार; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू!

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार झालेल्या एका अज्ञात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे. बिहारी कामगार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या तरुणाला आज रात्री सव्वा आठच्या सुमारास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले; मात्र प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
      तरुणाच्या गळ्यावर खोल जखम आढळून आल्याने घटनेचे नेमके स्वरूप काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा हल्ला होता की अन्य काही कारणामुळे तरुण जखमी झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मृत तरुणाची ओळखही समोर आलेली नसून, पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे.
      घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस पथकाने रुग्णालयात धाव घेतली. तरुणासोबत आलेल्या अन्य बिहारी कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून घटनाक्रमाची माहिती घेतली जात असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
       या घटनेच्या वेळी डॉ. अनिकेत गुरव, डॉ. मयूर सुळेभावकर, डॉ. फातिमा फेमिन, परिचारिका केरकर यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ‘जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजू मसुरकर हेही रुग्णालयात उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!