ठळक घडामोडी

राधानगरीतील बेपत्ता तरुणी मालवणमध्ये सुखरूप; पोलिसांच्या तत्परतेने पालकांकडे सुपूर्द!

मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)
      राधानगरी येथून किरकोळ वादातून घराबाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी मालवण येथील दांडेश्वर मंदिरात सुरक्षित आढळून आली. मालवण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या तरुणीचा शोध घेतला आणि अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले.
      राधानगरी येथील एका तरुणीचा घरच्या मंडळींसोबत किरकोळ वाद झाला होता. या वादातून ती संतापून घराबाहेर पडली. ती राधानगरी बसस्थानकात आली आणि तेथून वेंगुर्ले जाणाऱ्या बसमध्ये बसून मंगळवारी रात्री वेंगुर्ले येथे पोहोचली. त्यानंतर काल बुधवारी सकाळी ती प्रवास करत मालवण येथे आली.
      मालवणमध्ये पोहोचल्यानंतर ती दांडी येथील प्रसिद्ध दांडेश्वर मंदिरात गेली. तेथील एका स्थानिक नागरिकाच्या मोबाईलवरून तिने आपल्या मित्राला फोन केला. संबंधित मित्राने ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्या नंबरवर संपर्क साधल्यावर तिने आपण मालवण येथे असल्याचे सांगितले. दरम्यान, राधानगरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद आधीच दाखल करण्यात आली होती.
      तरुणीने मालवणमधून फोन केल्याची माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित पाटील आणि सहायक पोलीस गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील अभिजित भोसले, अमीर मुजावर, करिश्मा चिंदरकर व रामेश्वर करे यांनी तातडीने दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात शोध मोहीम राबवली. या शोधमोहिमे दरम्यान ती तरुणी पोलिसांना सुखरूप मिळून आली.
      पोलिसांनी तिला तत्काळ मालवण पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी तिच्याशी संवाद साधत तीची विचारपूस केली आणि तिच्या पालकांशी संपर्क साधला.
      रात्री उशिरा राधानगरी पोलीस ठाण्याचे पथक तिच्या वडिलांसह मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या सुरक्षित सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या तत्पर व संवेदनशील कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!