
जलसंधारणासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व कुडाळ तालुका पत्रकार समितीचा सहभाग
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी देखील सहभागी
कुडाळ : प्रतिनिधी
दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी पावशी कुंभारवाडी येथील ओहळावर श्रमदानातून वनराई कच्चा बंधारा बांधण्यात आला. पावशी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, पोलीस पाटील शेखर पोखरे, गंगाराम पारकर (बोरभाट), अरविंद बिले (बेलनदी), युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल पावसकर आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी गावागावांत बंधारे उभारण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पावशी येथे श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देण्यात आला.
यावेळी कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, प्रमोद म्हाडगूत, रवी गावडे, निलेश जोशी, अजय सावंत, काशिराम गायकवाड, संजय जोशी, संजय तेंडोलकर, प्रसाद राणे, अरुण अणावकर, समुदाय वैद्यकीय अधिकारी एस. डी. कुशे, ग्राम महसूल अधिकारी लता पाटील, अंगणवाडी सेविका दीपावली फोंडके, सरिता माळके, सुचित्रा भोगटे, किशोरी नालंग, अपर्णा पावसकर, आशा स्वयंसेविका राजश्री धुरी, त्रिशा शेलटे, आरोग्य सेविका मनीषा कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला.
लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, पावशीतील या सामूहिक प्रयत्नातून पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाचा आदर्श निर्माण झाला आहे.








