ठळक घडामोडी

कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडीतील महावितरणच्या कार्यालयातील पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी!

शिवसेना शहरप्रमुख – नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी उपाययोजनेच्या सूचना

कुडाळ : कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडी परिसरात महावितरणच्या कार्यालयासाठी वापरण्यात येणारे पाणी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबत नागरिकांनी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्याकडे तक्रार केली.
      स्थानिक नागरिकांची तक्रार समजताच अभिषेक गावडे यांनी कोणतीही दिरंगाई न करता वेंगुर्लेकरवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात तातडीने धडक देत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान पाण्याचा होत असलेला अपव्यय त्यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत पाण्याची अशा प्रकारे नासाडी होणे योग्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
     “यावर्षी पाण्याची उपलब्धता कमी असताना प्रत्येक थेंबाचे महत्त्व आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या कार्यालयातूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होणे ही गंभीर बाब आहे,” अशी भूमिका अभिषेक गावडे यांनी यावेळी मांडली.
      पाण्याची गळती व ओव्हरफ्लोची समस्या केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येत्या दोन दिवसांत ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
      नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयातूनच पाण्याची नासाडी होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनीही नमूद केले.या पाहणीवेळी शिवसेना नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहरप्रमुख चेतन पडते, शिवसेना शाखाप्रमुख विजय पावसकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!