
‘सही पोषण, देश रोशन’; नवरात्री अन् पोषण माहचा अनोखा संगम
कणकवली : 9 व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 व नवरात्री उत्सवानिमित्त बिडवाडी अंगणवाडी केंद्रात काल गुरूवारी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
नवरात्रीचे नऊ रंग, आहारातून मिळे आरोग्याचे तरंग – सही पोषण, देश रोशन! या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात नऊ बालिकांना नऊ रंगाचे कपडे परिधान करून, प्रत्येकीच्या हातात त्या रंगाचा पोषण संदेश असलेला बॅनर देण्यात आला.
उदा. पांढरा कपडा घातलेल्या बालिकेच्या हातात दूध-दहीचा बॅनर, लाल रंगाच्या बालिकेकडे अनार-बीट, हिरव्या रंगाच्या बालिकेकडे पालक-मेथी इत्यादी. त्यानंतर त्या नऊ रंगाच्या पौष्टिक पदार्थांची (फळे, लाडू, खिचडी) भेट देऊन नऊ बालिकांचे पूजन करण्यात आले. यामुळे उपस्थितांमध्ये नवरात्रीचा भक्तिभाव आणि पोषणाचा संदेश दोन्ही एकत्र पोहोचला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक पर्यवेक्षिका योगिता पई होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका विभूती राणे, दिव्या राणे, अक्षता लाड व संजना तांबे आणि गावातील शिक्षक वृंद उपस्थित होते.
सरपंच चव्हाण म्हणाल्या, “नवरात्रीतील कन्या पूजन आणि पोषण माहचा संगम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, यातून मुलींचा सन्मान आणि सकस आहार दोन्हीचा संदेश जातो.” कार्यक्रमास महिला बचत गट, गरोदर माता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









