ठळक घडामोडी

पिंगुळी-काळेपाणीत बंद घर फोडून २१ लाखांचा ऐवज लंपास!

१४ तोळे सोन्यासह १.२० लाखांची रोकड लंपास

कुडाळ पोलीसांकडून तपास सुरू

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-काळेपाणी येथील गवळदेव मंदिर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
      याबाबत शुभांगी शंकर सावंत (वय ४९, रा. पिंगुळी-काळेपाणी, मूळ रा. खानोली-आवेरे, ता. वेंगुर्ला) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या सासूचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाल्याने सावंत कुटुंबीय घर बंद करून खानोली येथील मूळ गावी गेले होते.
      ११ ऑक्टोबर रोजी सावंत यांचा मुलगा किरण काही आवश्यक कपडे व साहित्य घेण्यासाठी पिंगुळीतील घरी आला होता. काम आटोपल्यानंतर त्याने घराला कुलूप लावून तेथून प्रस्थान केले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांचा दुसरा मुलगा किसन घरी आला असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
       घरात प्रवेश करून पाहणी केली असता हॉलमधील कपाटाचा ड्रॉवर उघडा होता. बेडरूममधील कुलपे तोडण्यात आली होती, तर लोखंडी कपाटांमधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. याची माहिती किसन याने आई शुभांगी सावंत यांना दिली. त्यांनी घरी येऊन तपासणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
      तक्रारीनुसार, चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे ४० ग्रॅम वजनाचे दोन पदरी मंगळसूत्र, १२ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र, सोन्याच्या चेन, माळ, हार, झुमके, कानातील सोन्याच्या पट्ट्या, अंगठ्या, ब्रेसलेट, बट आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय घरातील १ लाख २० हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे एकूण वजन सुमारे १४ तोळे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
       चोरट्यांनी प्रथम घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कुलपे आणि लोखंडी कपाटे उचकटून मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचा प्राथमिक तपशील समोर आला आहे.
       घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. बडवे यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. बंद घराला लक्ष्य करून झालेल्या या मोठ्या चोरीचा तपास कुडाळ पोलीस करत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!