
१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने पटकावला तृतीय क्रमांक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विभागातरावर झेप घेत यश संपादन केले. या संघाने बलाढ्य संघाशी झुंज देत आपल्या खेळाच्या कौशल्याची छाप पाडली.चिकाटी व जिद्द आणि सांघिक खेळाच्या जोरावर विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.
यावर्षीच्या शालेय क्रीडा स्पर्धत व्हॉलीबॉल क्रीडाप्रकारात प्रदीर्घकाळ दबदबा असलेल्या बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या 17 वर्षीय मुलांच्या संघाने यावर्षीही व्हॉलीबॉल खेळात चमकदार कामगिरी केली. या संघाने कुडाळ तालुकास्तरावर आपला प्रतिस्पर्धी पाट हायस्कूलच्या संघाला अंतिम फेरीत पराभूत करुन जिल्हास्तरावर मुसंडी मारली होती. जिल्हास्तरावर या संघाने दमदार कामगिरी करीत अंतिम सामन्यात मजल मारली.अंतिम सामन्यात वेंगुर्ले संघाला पराभूत करीत विभागस्तरावर झेप घेतली होती. विभागस्तरावर पाहिल्या सामन्यात कोल्हापूर-मनपा संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सांगली संघाकडून या संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, संघातील खेळाडूंनी मनाने खचून न जाता तृतीय क्रमांकासाठी सातारा संघाशी लढत दिली. या सामन्यात सातारा संघाला पराभूत करीत विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे विद्यालया बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
विद्यालयाच्या या विजयी संघातील यज्ञेश पिंगुळकर, दिव्येश तळवणेकर, मयुरेश धुरी, निरज मेस्त्री, अनुष पिंगुळकर, कार्तिक राटुळ, वसंत धुरी, हर्षदकुमार लिंबाणी, प्रज्ज्वल राऊळ, आयुष जाधव, विराज नाईक या खेळाडू विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाला जिंकून देण्यासाठी सांघिक खेळ, चिकाटी व अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडविले.
मुख्याध्यापक भास्कर पारधी व सहाय्यक क्रीडा शिक्षक यशवंत (दादा) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी ओंकार सावंत, पिट्या कुडपकर, अभिजित चव्हाण, शुभम चव्हाण, अभिषेक वेंगुर्लेकर व ज्येष्ठ शिपाई राजन मांजरेकर यांनीही विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, संस्था पदाधिकारी व संचालक तसेच मुख्याध्यापक श्री. पारधी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडू विद्यार्थी व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. शालेय क्रीडा स्पर्धेच्या व्हालीबॉल खेळ प्रकारात लक्ष्मी नारायण विद्यालयाने सातत्याने आपला दबदबा राखत जिल्ह्यात आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षातील विजयाने विद्यालयाच्या या संघाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.









