
सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली मृतदेह आढळला
कुडाळ तालुक्यातील घटना; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली शनिवारी सायंकाळी २५ वर्षीय दामिनी पालव नामक युवतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवतीच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्याने या घटनेत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून, संशयिताचा शोध सुरू केला आहे. दरम्यान संशयिताच्या शोधासाठी पोलिसांकडून सहा पथके तैनात करण्यात आली असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित युवती हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती शनिवारी सायंकाळी बसने कडावल बसथांब्यावर उतरून तेथून पायी घरी जात असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुडाळ पोलीस ठाणे तसेच कडावल पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास विविध दिशांनी सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. युवतीवर हल्ला कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









