ठळक घडामोडी

भंगसाळ बंधारा बांधणार हे समजल्यावर अल्टिमेटम देऊन स्टंटबाजी करू नका!

शिवसेना शाखाप्रमुख दिवाकर उर्फ राजन जळवींचा ठाकरे शिवसेना नगरसेवक मंदार शिरसाट यांना टोला

दुष्काळात तरी राजकारण करू नका; ‘अल्टिमेटम देण्यापेक्षा लोकांमध्ये उतरून काम करण्याचा सल्ला

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ भंगसाळ नदीवरील बंधारा बांधण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले असताना नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम देऊन स्टंटबाजी करू नये. निदान दुष्काळजन्य परिस्थितीत तरी राजकारण करू नका, असा सल्ला कुडाळ-कविलकाटे शिवसेना (शिंदे) शाखाप्रमुख दिवाकर उर्फ राजन जळवी यांनी दिला आहे.
      जळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाकडून वारंवार ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी उपलब्ध पाणीसाठे जतन करणे आणि वाहून जाणारे पाणी अडविणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत सत्ताधारी-विरोधक असा राजकीय संघर्ष करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नगरसेवक मंदार शिरसाट हे प्रत्यक्ष लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याऐवजी प्रसिद्धी आणि रिल्सच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जळवी यांनी केला. स्वतः पुढाकार घेऊन एकही बंधारा बांधण्यासाठी सहभाग न घेता पाटबंधारे विभागाला सात दिवसांचा अल्टिमेटम देणे योग्य नाही. सध्या नागरिकांना आंदोलनाच्या इशाऱ्यांपेक्षा पाण्याची अधिक गरज आहे. ओहोळ, नाले आणि नद्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
        भंगसाळ नदीवरील गणेश घाट परिसरात बंधारा बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक प्लेटा टाकून काम सुरू करण्याची तयारी केली असताना शिरसाट यांनी अल्टिमेटम दिला. त्यामुळे काम सुरू होण्याचे श्रेय घेण्यासाठीच हा आंदोलनाचा इशारा दिला जात आहे का, असा सवालही जळवी यांनी उपस्थित केला आहे.
       विठ्ठलवाडी येथील नागरिकांनी गवत कापण्याच्या कामासाठी अनेक दिवस मागणी करूनही शिरसाट ही मागणी पूर्ण करू शकले नाहीत, असा आरोप करत जळवी यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नगरपंचायतीचे गटनेते असूनही आपल्या गटातील आठ नगरसेवक एकत्र ठेवता आले नाहीत, त्यांनी प्रथम आपल्या संघटनात्मक कामाकडे लक्ष द्यावे आणि नंतर अल्टिमेटमची भाषा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
       ‘जनसेवा ही केवळ राजकारण करून किंवा प्रसिद्धी मिळवून साध्य होत नाही. त्यासाठी लोकांमध्ये उतरून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आणि प्रत्यक्ष श्रमदानातून काम करावे लागते,’ असे सांगत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील सात-आठ महिन्यांतील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन सर्वांनी जलसंधारणाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन दिवाकर उर्फ राजन जळवी यांनी केले आहे.

error: Content is protected !!