ठळक घडामोडी

दामिनी पालवला न्याय मिळवून देण्यासाठी आज कडावलमध्ये बैठकीचे आयोजन!

सायंकाळी ६ वाजता महापुरुष मंदिरात श्रद्धांजली सभा

पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दामिनीला न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होता यावे, यासाठी आज रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कडावल येथील महापुरुष मंदिरात न्यायसभा व भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
      दामिनीच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाला आधार देण्याबरोबरच या प्रकरणाचा तपास जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, या मागण्यांसाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      ही सभा केवळ श्रद्धांजली अर्पण करण्यापुरती मर्यादित नसून, दामिनीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीला लोकशाही मार्गाने बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात येणार आहे. या न्यायसभेला पंचक्रोशीतील नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील माता-भगिनी, युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
      दामिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!