ठळक घडामोडी

दामिनी पालव खून प्रकरणी मोठी घडामोड; संशयित मठ येथून पोलिसांच्या ताब्यात!

पोलीस पथकांच्या शोधमोहिमेला यश; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू

कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील घटना

कुडाळ : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी साहील विश्राम धुरी याला अवघ्या काही तासांतच पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून शनिवारी रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सहा पोलीस पथकांकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेला या कारवाईमुळे यश आले आहे.
       कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे काल शनिवारी सायंकाळी दामिनी पालव या युवतीचा धारदार चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे वर्दे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताचा शोध घेण्यासाठी सहा पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशांनी शोधमोहीम राबवली.
     या प्रयत्नांनंतर संशयित साहील धुरी याला वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आता दामिनी पालव हिच्या हत्येमागील नेमके कारण काय, गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी पकडल्यानंतर नागरिकांचे लक्ष आता पुढील पोलीस तपासाकडे लागले आहे.

error: Content is protected !!