
संशयित आरोपीला अटक; २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
कुडाळ पोलिसांकडून सखोल तपास सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वर्दे – खालची पालववाडी येथील दामिनी किरण पालव (वय २३ ) हिच्या खूनप्रकरणी संशयित साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ, ता. वेंगुर्ले) याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या पाच तासांत मठ येथील घरातून ताब्यात घेत अटक केली. एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कुडाळ पोलिसांनी त्याला रविवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असल्याची माहीती कुडाळचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी वर्दे खालची कुंभारवाडी येथील सायल्याचा ओहळावरील पुलाजवळ दामिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या धक्कादायक घटनेने कुडाळ तालुक्यासह जिल्हा हादरला होता. तालुक्यातील एका काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणारी दामिनी काॅलेज सुटल्यावर एसटी बसने बसस्टाॅपवर उतरून घरी जात असताना संशयिताने तिला वाटेत अडवून हल्ला केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. याबाबतची फिर्याद दामिनीचे वडील किरण पालव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस पथकांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी रात्री उशिरा संशयिताला मठ येथून ताब्यात घेतले. रविवारी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
दामिनीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.









