ठळक घडामोडी

दामिनी पालव हिला न्याय मिळवून देण्यासाठी कडावल परिसरातील ग्रामस्थ एकवटले!

खून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी

आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार

कुडाळ : वर्दे येथील कु. दामिनी किरण पालव हिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. तिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यात यावे, अशी मागणी कडावल येथे झालेल्या शोकसभेत ग्रामस्थांनी केली. यासाठी उद्या सोमवारी (१९ ऑक्टोबर) जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
      कुडाळ तालुक्यातील वर्दे खालची पालववाडी येथील २३ वर्षीय दामिनी पालव हिचा शनिवारी सायंकाळी निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ, ता. वेंगुर्ले) याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी सायंकाळी कडावल येथील श्री महापुरुष मंदिरात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला दामिनी पालव हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दामिनी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. अशा घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
       या प्रकरणाचा जलदगतीने तपास होऊन दामिनी व तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी दत्ता सामंत, दादा साईल, संजय पडते, काका कुडाळकर, मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर व दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती सदस्य श्रावणी तेरसे, कडावल सरपंच रश्मी मोरजकर, उपसरपंच स्वरूप वाळके, निरूखे सरपंच कीर्तीकुमार तेरसे, भडगाव सरपंच गुणाजी लोट, रिक्षा संघटना अध्यक्ष साई तावडे, कडावल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथ मुंज, श्रीकृष्ण शिरोडकर, वर्दे पोलीस पाटील सागर पालव, रवींद्र सावंत, विनायक राणे, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, राहुल मोरजकर, तुषार परब, रूपेश सावंत, सचिन तवटे, आकाश साळगावकर, शेखर मोरजकर, घनश्याम तेरसे, अक्षय देवळी, भार्गव सावंत यांच्यासह दशक्रोशीतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना जिल्हाप्रमुख तथा कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांनी पुढाकार घेत या शोकसभेचे आयोजन केले होते.

error: Content is protected !!