
अध्यक्ष योगेश कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत; २२ वर्षांची सामाजिक उपक्रमांची परंपरा
कुडाळ : कुडाळ शहरातील उत्कर्षनगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव २०२६ ला शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सदिच्छा भेट देऊन श्री दुर्गा देवीचे दर्शन घेतले. यावेळी भारतमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष योगेश कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिषेक गावडे यांचे स्वागत केले.
कुडाळ शहरात भारतमाता मित्रमंडळाला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा आहे. गेल्या २२ वर्षांपासून दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये महिलांसाठी विविध खेळ, पैठणीचा कार्यक्रम, पाककला स्पर्धा तसेच दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळाकडून सातत्याने केले जात आहे.
गेल्या २२ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्याचे तसेच सामाजिक कार्यात सहभाग वाढविण्याचे काम भारतमाता मित्रमंडळाकडून केले जात आहे. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांचे परिसरातील नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे.
अभिषेक गावडे यांच्या समवेत शिवसेना उपशहरप्रमुख चेतन पडते उपस्थित होते. तसेच भारतमाता मित्रमंडळाचे कार्यकर्ते विजय तुडयेकर, प्रथमेश उपळेकर,अमर अणसूरकर हितेश तिरवडेकर, सचीन आकेरकर सुनिल गाळवणकर, सनी गावडे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त उत्कर्षनगर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, मंडळाच्या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.









