
२१ ऑक्टोबरपासून वनराई बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात
शहरात ठिकठिकाणी बंधारे उभारणार – मंदार शिरसाट
कुडाळ : शहरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी आणि येत्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नांतून कुडाळ शहरात विविध ठिकाणी पाणी अडवा बंधारे बांधण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण लोकपयोगी उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी नगरसेवक शिरसाट यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष श्रमदानातून आणि विशेष सहकार्यातून हे बंधारे उभारले जाणार आहेत. या मोहिमेमुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाणीपातळीत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. सकाळी ८.३० वाजता ओमकार नगर येथील श्री. शिंदे यांच्या घराशेजारी पहिल्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात येणारअसून या प्रसंगी ओमकार नगरमधील नागरिक प्रमुख उपस्थित राहून श्रमदान करणार आहेत. नंतर सकाळी ११ वाजता विठ्ठलवाडी रो हाऊस शेजारी दुसऱ्या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ होईल. या ठिकाणी विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती व विशेष सहकार्य लाभणार आहे, अशी माहीती मंदार शिरसाट यांनी दिली.
या सुरुवातीच्या टप्प्यानंतर, आगामी काळात कुडाळ शहरातील इतर विविध भागांतही स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन अशाच प्रकारे वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. लोकसहभागातून संपूर्ण शहर जलसमृद्ध करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कुडाळ शहराला पाण्याचा तुटवडा भासू नये आणि पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या पर्यावरणपूरक उपक्रमात दोन्ही परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









