ठळक घडामोडी

दामिनी पालव खून प्रकरणी कुडाळ पोलीसांकडून तपासाला वेग!

संशयिताने खूनासाठी वापरलेला चाकू आणि वाहन जप्त

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील काॅलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिच्या खून प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. तिचा खुन करण्यासाठी संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ, ता. वेंगुर्ले) याने वापरलेले धारदार हत्यार (चाकू) पोलिसांनी जप्त केले आहे. संशयित साहिल याने गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच दामिनी आणि साहिल यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
        शनिवारी सायंकाळी वर्दे खालची कुंभारवाडी येथील सायल्याच्या ओहळानजीक दामिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद दामिनीचे वडील किरण पालव यांनी कुडाळ पोलिसात दिली. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपी साहिलला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या पाच तासांत मठ येथील घरातून ताब्यात घेत कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून रविवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 ऑक्टोबर पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दामिनीवर आठ ते दहा वार झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत, अशी माहीती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

error: Content is protected !!