
‘आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय?’ राजन चिके यांचा संतप्त सवाल; सत्ताधाऱ्यांकडून निधी आराखड्याला मंजुरी
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आधीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब मागतानाच विकासकामांच्या यादीतून डावलल्याचा आरोप विरोधकांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, सत्ताधारी सदस्यांनी एकगट्ट्याने ठराव मंजूर करत केंद्रीय १६ व्या वित्त आयोगाच्या सन २०२६-२७ च्या निधी आराखड्याला मंजुरी दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज ही विशेष सभा पार पडली. केंद्रीय १६ व्या वित्त आयोगाच्या निधी आराखड्याला मंजुरी देण्यासाठी आयोजित केलेल्या या सभेच्या सुरुवातीपासूनच विकासकामांच्या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले. विरोधकांनी निधीवाटपातील कथित अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
सभा सुरू होताच विरोधी गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही सुचविलेली कामे यादीतून का वगळण्यात आली? आमच्यावरच अन्याय का केला जात आहे? आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर सत्ताधारी गटाचे सदस्य रूपेश कानडे यांनी विषयपत्रिकेनुसार सभेचे कामकाज पुढे नेण्याची सूचना केली. मात्र, विरोधी गटाचे रूपेश पावसकर, संजय नाईक, संजय गावडे आणि गंगाराम सडवेलकर यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. आधीच्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचे काय झाले, त्यातून कोणती कामे झाली आणि त्याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक अधिकच तीव्र झाली.
सत्ताधाऱ्यांकडून ठराव मंजूर; विरोधकांचा निषेध
या वादात सत्ताधारी गटाचे संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर आणि रूपेश कानडे यांनी विरोधकांच्या भूमिकेला विरोध दर्शवला. दरम्यान, १६ व्या वित्त आयोगाच्या निधी आराखड्याला मान्यता देणारा ठराव मंजूर करण्यात आला.
संदेश सावंत यांनी विरोधी सदस्यांची वैयक्तिक मते नोंदवून घेण्याची सूचना केली. मात्र, आमचा या सभागृहात कायदेशीर अधिकार असताना आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल, तर ही चुकीची कार्यपद्धती आहे, अशी भूमिका विरोधी सदस्यांनी घेतली. दबावाच्या राजकारणाचा तीव्र निषेध करत त्यांनी ‘निषेध, निषेध, निषेध असो’ अशा घोषणा दिल्या आणि सभात्याग केला.
अध्यक्ष प्रमोद कामत यांचीही नाराजी
सभागृहात गोंधळ सुरू असतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेतील काही सदस्यच सभागृहातील छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करतात आणि त्यामुळे बदनामी होते, हे अजिबात योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष सभेला जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मात्र, विकासकामांच्या निधीचे वाटप, जुन्या निधीचा हिशेब आणि विरोधकांच्या मागण्यांवरून झालेल्या वादामुळे ही सभा चांगलीच गाजली.









