ठळक घडामोडी

कुडाळच्या भंगसाळ बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली; दोघांना ग्रामस्थांनी वाचविले!

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडले. मात्र, शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या दोघांनाही दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
        मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल गुलमोहोरनजीक असलेल्या भंगसाळ बंधाऱ्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी साठवणुकीसाठी लोखंडी प्लेट्स टाकण्याचे काम सुरू आहे. या प्लेट्स बंधाऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. याचदरम्यान बंधाऱ्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. यावेळी दुचाकीवरील आई आणि मुलगाही पाण्यात पडले. जखमी आंबडपाल येथील सावंत असल्याचे समजते.
      घटनेची माहिती मिळताच शेलटेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नदीपात्रात पडलेली दुचाकीही बाहेर काढण्यात आली.

error: Content is protected !!