
सिंधुदुर्ग भाजप आणि युवा मोर्चाचे हितेन नाईक यांचा पुढाकार
सावंतवाडी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेत सावंतवाडी येथे १ नोव्हेंबर रोजी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रातील युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर आणि ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शरीरसौष्ठवपटूंची ताकद, मेहनत, शिस्त आणि जिद्द यांचे दर्शन घडविणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता वाढवणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या आयोजनामागील उद्देश आहे.
या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.
स्पर्धेचा तपशील
दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ६ वाजता
स्थळ : जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी
‘फिट राहा, निरोगी राहा’ हा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





