
26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह
सिंधुदुर्गनगरी : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-2026’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ हा या सप्ताहाचा संदेश आहे. शासकीय कामासाठी नियमानुसार निर्धारित शुल्काव्यतिरिक्त कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी पैशांची अथवा वस्तूची मागणी करीत असल्यास, ती लाचेची मागणी समजावी. लाच देणे आणि लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांकडे शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी झाल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, सिंधुदुर्ग कार्यालयाचा व्हॉट्सॲप क्रमांक 9922891064 किंवा विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in यांचा वापर करता येईल.





