
मालवण : महेश कदम
मालवण सागरी महामार्गावरून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या संयुक्त छाप्यामध्ये वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडण्यात आले. हे तिन्ही डंपर पुढील दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
रात्री उशिरा झालेल्या या धडक कारवाईमुळे मालवण शहर व परिसरातील बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अवैध व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जप्त करण्यात आलेल्या तिन्ही डंपरची तपासणी केली असता, प्रत्येक डंपरमध्ये दोन ब्रास वाळू अनधिकृतपणे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. नियमांनुसार या तिन्ही डंपरवर प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच, संबंधित वाहनचालकांना नोटीस बजावून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची योग्य संधी प्रशासनाकडून दिली जाणार आहे.
वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाळू वाहतूकदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महसूल व पोलिसांच्या या संयुक्त मोहिमेमुळे अवैध वाळू तस्करीला काही प्रमाणात आळा बसेल अशी आशा व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांपासून अधिकृतपणे वाळूचे लिलाव झाले नसल्याने रात्रीच्या वेळी वाळूची अवैध वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाकडून वाळू लिलाव प्रक्रिया सुरू होईल असे वारंवार सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही अंतिम कारवाई होत नाही. यामुळे डंपर व्यावसायिक व कामगारांना आपली रोजीरोटी चालविण्यासाठी नाईलाजास्तव वाळू वाहतूक करावी लागत असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष घालून अधिकृतपणे वाळू लिलाव प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





