
सिंधुदुर्गनगरी : जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार विकसित करण्यात आलेली नवीन संगणकीय प्रणाली दि. 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्जाची किंवा जोडलेल्या कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
नवीन प्रणालीसाठी https://cvc.barti.in/home हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवरून अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज सादर केल्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंत अर्जाची सद्यस्थिती कोणत्या टप्प्यावर आहे, याचे ऑनलाइन ट्रॅकिंगही करता येणार आहे.
अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला काही शंका असल्यास संबंधित अर्जदाराशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यात येईल. या माध्यमातून ऑनलाइन चर्चा व सुनावणी घेऊन अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सादर केलेले पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीकडून गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येईल.
नवीन प्रणाली पूर्णतः ऑनलाइन असल्यामुळे अर्जासंदर्भात नियमित कामकाजासाठी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. अर्ज प्रक्रियेबाबत माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास बार्टी मुख्यालय, पुणे येथील मदतकक्षाशी संपर्क साधावा. यासाठी दूरध्वनी क्रमांक 020-26333339, व्हॉट्सॲप क्रमांक 9404999452 किंवा helpdesk@barti.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव तुषार गवळी यांनी केले आहे.





