
सिंधुदुर्गनगरी : दिवाळीच्या सणानिमित्त परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि व्यावसायिक भागीदारांना पत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, भेटवस्तू, पार्सल तसेच दिवाळीचा फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सिंधुदुर्ग विभागामार्फत विविध आंतरराष्ट्रीय टपाल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेऊन परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत आपुलकीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.
भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय टपाल पाठविण्यासाठी विविध सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये तातडीच्या टपालासाठी ‘इंटरनॅशनल स्पीड पोस्ट (EMS)’, टपालाचा मागोवा घेण्याच्या सुविधेसह ‘इंटरनॅशनल ट्रॅक्ड पॅकेट सर्व्हिस (ITPS)’, जड वस्तू पाठविण्यासाठी ‘इंटरनॅशनल एअर पार्सल’ आणि व्यावसायिक वस्तूंच्या पाठवणीसाठी ‘इंटरनॅशनल स्पीड पोस्ट मर्चंडाइज’ या सेवांचा समावेश आहे.
या सेवांचे बुकिंग संबंधित गंतव्य देशातील उपलब्धता, वस्तूंचे वजन, लागू दर आणि त्या देशाचे आयात नियम यांनुसार करता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून आंतरराष्ट्रीय टपाल सेवांची माहिती, लागू दर, वजनमर्यादा आणि बुकिंगसाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्यावीत. अधिक माहितीसाठी रवी मोरये, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सिंधुदुर्ग डाक विभाग मोबाईल 8668890125 येथे संपर्क साधावा.





