
नेरूर गोंधयाळे परिसरात कीटकांचा शिरकाव; कुडाळ एमआयडीसीतील समस्येवर कारवाईची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसी परिसरातील धान्य गोडाऊनमधून होणाऱ्या ‘टोक्यां’च्या प्रादुर्भावामुळे नेरूर गोंधयाळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. घराघरांत शिरणाऱ्या या कीटकांमुळे खाज, ॲलर्जी, खोकला आणि झोपेच्या समस्या वाढल्या आहेत. काही कीटक जेवणात, कानात शिरत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या पाहणीत या तक्रारींची वस्तुस्थिती समोर आल्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह सदरील गोडाऊन बंद करण्याची मागणी जि. प. सदस्य रूपेश पावसकर यांनी केली आहे. कुडाळ एमआयडीसी येथे आज गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पावसकर म्हणाले की, या कीटकांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित गोडाऊन बंद करण्याची मागणी केली होती. यापूर्वी जून महिन्यातही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पुरवठा विभागाकडे पाठविल्यानंतर कुडाळच्या तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दिवसा पाहणी करताना कीटक आढळले नाहीत; मात्र रात्रीच्या पाहणीत कीटक आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. प्रत्यक्ष पाहणीत कीटक आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. इतकेच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल बदलण्यास सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे श्री. पावसकर यांनी सांगितले. एमआयडीसीतील गोडाऊनमधील कीटकांचा उपद्रव थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी आमची मागणी असल्याचे श्री. पावसकर यांनी सांगितले.
रूपेश पावसकर म्हणाले, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल ४०० ते ४५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाही थकीत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर समस्येबाबत महाविद्यालयाच्या श्री. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पगार थकीत असल्याची वस्तुस्थिती खरी असल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराने आपला मोबाईल फोन बंद (स्विच ऑफ) करून ठेवला असून ते कोणत्याही फोनला प्रतिसाद देत नाहीत. या परिस्थितीची दखल घेत डीन यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला आहे. जर कर्मचाऱ्यांना त्यांचा थकीत पगार मिळून न्याय न मिळाल्यास, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पावसकर यांनी दिला आहे




