
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या शहरात कचरा उचलणाऱ्या सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवस नादुरुस्त असल्याची बाब आजच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत नादुरुस्त घंटागाड्याबाबत अहवाल देण्याबाबत ठरले असताना अजून तो अहवालाच आला नसल्याची बाब आजच्या कुडाळ नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत समोर आली आणि सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर लवकरच यासाठी विशेष सभा लावून निर्णय घेऊ असे मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी सांगितले. या सभेत फॉगिंग मशीनच्या अयोग्य नियोजनावरून उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कुडाळ नगर पंचायतची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहरात मच्छरांचा उपद्रव वाढला असून फॉगिंग मशीनचे प्रभागनिहाय योग्य नियोजन केले जात नाही याबाबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. फक्त फोटो काढून दाखवण्यापूरता फॉगिंग मशीनचा वापर न करता नागरिकांना उपयोग होईल असा वापर सर्व वॉर्डमध्ये झाला पाहिजे असे किरण शिंदे यांनी सांगितले. नगर पंचायतचा आरोग्य विभाग उदासीन का, असा सवाल करत शिंदे यांनी सर्व प्रभागात फॉगिंग मशीनचा समान वापर झाला पाहिजे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाड्या खरेदी करण्याचा विषय चर्चेत आला असता, सहा घंटागाड्या बंद असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. त्यावर उपनगराध्यक्ष शिंदे यांनी नादुरूस्त गाड्यांचा सर्व्हे करण्याचे यापूर्वी ठरले होते मग तसा सर्व्हे झाला आहे का? असा सवाल प्रशासनासमोर उपस्थित केला. नगरसेवक मंदार शिरसाट यांनीही नवीन नवीन गाड्या घेताय मग जून्या गाड्या तशाच पडून ठेवणार आहात का? असा सवाल उपस्थित केला. नगरसेविका ज्योती जळवी यांनी काहीवेळा सायंकाळी उशिरा साडेसात वाजता घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी फिरतात, अशा वेळेत नागरिक कचरा देणार का? असे सांगत वेळापत्रक नियोजन करण्याची मागणी केली. घंटागाड्यांच्या प्रश्नांबाबत नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाला तातडीने नियोजन करण्याच्या आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्याधिकारी पवळ यांनी या गाड्यांबाबत आठ दिवसांत सर्वकष नियोजन करण्याची ग्वाही सभागृहात दिली.
दरम्यान एमआयडीसी येथील घनकचरा प्रकल्प, त्यामध्ये बसविण्यात येणारी यंत्रसामग्री, शेड याविषयी पण सभागृहात चर्चा झाली. नगर पंचायतची वाहने धुण्यासाठी सर्व्हिसिंग पंप घेणे, रस्त्यावरचा कचरा हटविण्यासाठी ब्लोअर खरेदी करणे, जेसीबी खरेदी करणे आणि त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे याविषयी चर्चा करण्यात आली.
शहरात विद्युत खांब असलेल्या ५५ ठिकाणी पथदिवे नाहीत ही बाब बैठकीत समोर आली. त्यावर चर्चा करण्यात आली. शहरात नोंदणीकृत २३४ पथ विक्रेते आहेत, त्याना जागा आणि ओळखपत्र देताना स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेच्या शेवटी मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी आपल्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण देताना कोणीही या नियुक्तीबाबत चुकीची माहिती देऊ नये असे आवाहन केले. आपली नियुक्ती ऑक्टोबर २०२६ पर्यंत असली तरी त्यात ‘पुढील आदेश येईपर्यंत’ असा देखील पर्याय आहे. त्यामुळे आपल्या नियुक्तीच्या मुदतीबाबत चुकीची माहिती कोणी देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. त्याला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी देखील दुजोरा दिला.




