ठळक घडामोडी

पिंगुळी तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर!

ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
         सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिल्याने खेताडे यांना दिलासा मिळाला आहे.
       सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी खेताडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तलाठी कार्यालयात भेट न झाल्याने तक्रारदाराने खेताडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानुसार कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
     जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. सुहास सावंत यांनी, आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता दर्शविणारी कोणतीही सबळ कारणे पोलिसांकडून सादर करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा मांडला. तसेच आरोपीला अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नसल्याचा युक्तिवादही बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ओरोस येथील विशेष न्यायालयाने बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे ग्राह्य धरून जितेंद्र काळू खेताडे यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांना मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
      या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. सुहास सावंत, अॅड. निलांगी सावंत, अॅड. उमा सावंत, अॅड. रसिका सावंत, अॅड. संदेश कोएगावकर आणि अॅड. धनश्री टेंबुलकर यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!