ठळक घडामोडी

माणुसकीचा संकल्प… सेवाभावाचा वारसा… आणि निराधारांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण!

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा संविता आश्रम पणदूरसाठी स्तुत्य सेवासंकल्प!

कुडाळ : काही उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसतात, तर ते माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात. निराधार, अनाथ आणि गरजू व्यक्तींना प्रेमाने सांभाळणाऱ्या जीवन आनंद संस्था, संविता आश्रम पणदूर यांच्या सेवाकार्यास हातभार लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळने हाती घेतलेला मासिक आर्थिक मदतीचा उपक्रम हा असाच एक हृदयस्पर्शी सेवासंकल्प आहे.
      या उपक्रमांतर्गत आपल्या  रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या  २७ सदस्यांनी दरमहा प्रत्येकी ५०० रू. मदत देण्यास उत्स्फूर्त सहमती दर्शवली आहे. या सर्वांच्या सामूहिक योगदानातून पुढील पाच वर्षांत ८,१०,००० रूपये तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. लेनी डी कोस्टा यांनी स्वतः दिलेले २०,००० रूपये अशी एकूण ८ लाख ३०,००० रूपये (आठ लाख तीस हजार रुपये) मदत रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून जीवन आनंद संस्था, संविता आश्रम पणदूर यांना देण्यात येणार आहे. या सेवाकार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला. सन्माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. लेनी डी कोस्टा यांच्या हस्ते ८,३०,००० रू. चा औपचारिक धनादेश जीवन आनंद संस्थेचे संचालक श्री. संदीप परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहीती रोटरी क्लब कडून देण्यात आली.
     आठ लाख तीस हजार रुपये म्हणजे केवळ एक आर्थिक आकडा नाही; तर तो असंख्य निराधारांच्या आयुष्यात अन्नाचा घास, औषधोपचारांचा आधार, सुरक्षित संगोपन आणि मायेची ऊब पोहोचवण्याचा आपल्या सर्वांचा सामूहिक संकल्प आहे. आपल्यापैकी प्रत्येकासाठी दरमहा ५०० रूपये ही कदाचित छोटी रक्कम असेल; पण अनेक निराधार व्यक्तींसाठी त्यातून मिळणारा आधार अमूल्य ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हास्य, तिला मिळणारा प्रेमाचा आधार आणि तिच्या आयुष्यात निर्माण होणारी सुरक्षिततेची भावना यांची किंमत पैशांत मोजता येत नाही. या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या सर्व सदस्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येक सदस्याने दाखवलेली संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी यामुळेच एवढा मोठा सेवासंकल्प प्रत्यक्षात साकार होत आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या, सहमती दर्शवलेल्या आणि या कार्याला मनापासून पाठिंबा दिलेल्या सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानत असल्याचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी सांगितले.

error: Content is protected !!