ठळक घडामोडी

‘आदि अनंत’ चित्रपटातून कुडाळचा बालकलाकार आरव आईर मोठ्या पडद्यावर!

अशोक सराफ यांच्यासोबत आरवची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका

संकर्षण कऱ्हाडे यांची कथा, पटकथा आणि संवाद, 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित

कुडाळ : कुडाळच्या कलाक्षेत्रातील बालकलाकार आरव सुरेश आईर याला ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत आरव एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार असून, त्याच्या या कामगिरीमुळे कुडाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
       ‘आदि अनंत’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले असून, चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधरन छातवाणी, समीर हम्पी आणि अनिकेत मराठे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक बंधांची गोड गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे आणि परिसरात करण्यात आले आहे.
      चित्रपटात अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाठ, कविता लाड, श्रीरंग गोडबोले आणि कोकणचे सुपुत्र गीतकार गुरु ठाकूर यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत आरवची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
       पिंगुळी येथील उत्कर्षनगरचा रहिवासी असलेला आरव सध्या कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे. अवघ्या ११ वर्षांच्या आरवने अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स २०२४’ या रिअॅलिटी शोमध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. तसेच झी चित्र गौरव सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत अभिनय करण्याची संधी त्याला मिळाली.
      ‘मुंजा’, ‘सोरट’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांसह सन मराठी वाहिनीवरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या मालिकेत त्याने काम केले आहे. या मालिकेतील ‘दिघ्या’ ही त्याची भूमिका लक्षवेधी ठरली. ‘विण दोघातली ही तुटेना’ या मालिकेच्या गणपती विशेष भागात त्याने ‘गणू’ची भूमिका साकारली. ‘अंधारमाया’, ‘अथांग’ आणि ‘कल्की’ या वेबसीरिज तसेच विविध लघुपट आणि व्हिडिओ अल्बममधूनही त्याने अभिनय केला आहे.
      ‘धीम टॅंक डिटॅंग’ या एकांकिकेतील ‘गोपी’च्या भूमिकेसाठी अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२३ मध्ये त्याला उत्कृष्ट बालकलाकार प्रथम पुरस्कार मिळाला. अहमदनगर करंडक स्पर्धेत लक्षवेधी बालकलाकार पुरस्कार, तर ‘सिंड्रेला’ या लघुपटासाठी बेस्ट चाइल्ड अ‍ॅक्टर पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. ‘केकी’ या लघुपटासाठीही त्याने बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्कार मिळवला आहे. याशिवाय राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नृत्य व अभिनय स्पर्धांमध्येही त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
       बालवयातच अभिनयाच्या विविध माध्यमांतून आपली छाप उमटवणाऱ्या आरवसाठी ‘आदि अनंत’ हा चित्रपट महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ज्येष्ठ कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाल्याने त्याच्या पुढील कलाप्रवासाबद्दल उत्सुकता वाढली आहे. कुडाळच्या मातीतून पुढे आलेल्या या बालकलाकाराच्या यशामुळे स्थानिक कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!