
दोन होड्यांसह लाखांचे मासेमारी साहित्य जळून खाक
मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)
तारकर्ली वरचीवाडी येथील स्थानिक रहिवासी गुंडू कांदळगावकर यांच्या रापणीच्या कावनाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या आगीत दोन पारंपरिक होड्यांसह लाखो रुपयांचे मासेमारीचे साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कांदळगावकर कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मच्छीमार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्याचे समजताच परिसरातील स्थानिकांनी आणि तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून स्वतःहून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.
या दुर्दैवी घटनेत रापणीच्या कावनातील जाळे, होड्या आणि इतर महत्त्वपूर्ण मासेमारी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. प्राथमिक अंदाजानुसार यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन मासेमारीच्या हंगामात हक्काचे साधन जळाल्यामुळे कांदळगावकर कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. शासनाकडून या नुकसानीची तातडीने दखल घेऊन योग्य ती आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.







