
अधिष्ठातांना निवेदन, जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दिवाळी सण तोंडावर असतानाही वेतनाबाबत वारंवार टाळाटाळ होत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी अधिष्ठातांना निवेदन देत थकीत वेतन तातडीने अदा न केल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
‘एम/एस. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी हे निवेदन सादर केले. वेतनाबाबत कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, कंपनीकडून दुपारी एक वाजेपर्यंत निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, पुन्हा संपर्क साधल्यावर आणखी दोन दिवसांनी वेतन देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. कंत्राटी कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यातील असून, त्यांच्या वेतनाबाबत अशी टाळाटाळ करणे योग्य नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या न्याय्य मागण्या मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेमो देणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
घरखर्च, मुलांचे शिक्षण, हप्ते भागवणे कठीण
वेतन हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, वेळेवर पगार मिळत नसल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, बँकेचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतानाही वेतन थकत असल्याने आर्थिक तणावाचा सामना करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
थकीत वेतनाबाबत प्रशासनाने निश्चित कालमर्यादेसह लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा नियमानुसार काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वेतनाची बिले पाठवली; निधीची प्रतीक्षा
याप्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोतीफळे यांच्याशी रुपेश पावसकर यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले पाठवण्यात आली आहेत; मात्र अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. हा विषय मंत्रालय स्तरावरील असल्याने स्थानिक पातळीवर काही करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन स्मार्ट सर्व्हिसेस संस्थेमार्फत दिले जाते. सध्या काही कर्मचारी काम करत नसल्याने कामात सुधारणा व्हावी, या उद्देशाने त्यांना मेमो देण्यात आल्याचेही डॉ. मोतीफळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे थकीत वेतनाचा प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.






