
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे एफसीआयला कार्यवाहीचे आदेश
जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसी लगतच्या नेरूर-गोंधयाळे येथील धान्य गोदामातून परिसरातील घरांमध्ये टोक्यांचा (किड्यांचा) उपद्रव होत असल्याच्या तक्रारींची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) पनवेल विभागीय व्यवस्थापकांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहीती जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांनी दिली.
नेरूर-गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (एमएसडब्ल्यूसी) आणि भारतीय अन्न महामंडळाशी (एफसीआय) संबंधित धान्य गोदामामुळे गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील नागरिकांना किड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. गोदामातील टोके (किडे) परिसरातील घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांची झोपमोड होत असून, त्वचेला खाज येणे, अॅलर्जीमुळे खोकला येणे तसेच जेवणात टोके पडणे अशा समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या समस्येबाबत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी ८ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र, वालावल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग यांनीही अहवालाद्वारे या तक्रारीला दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेचे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे भारतीय अन्न महामंडळाच्या पनवेल विभागीय व्यवस्थापकांना कार्यवाहीचे निर्देश दिले. गोदाम आणि तेथे साठविण्यात येणारे धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित एफसीआय अधिकाऱ्यांची असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी कुडाळ येथील साठा अधीक्षकांनी पावसाळ्यापूर्वी फवारणी केली जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही किड्यांचा उपद्रव कायम असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.
आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीच या प्रकरणी निर्देश दिल्याने गोदामात प्रभावी कीटकनियंत्रणाची कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर म्हणाले, “नेरूर गोंधयाळे ग्रामस्थांच्या लढ्याचा हा पहिला विजय आहे. प्रशासनाने आमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. आता एफसीआयने सात दिवसांत कार्यवाही केली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण करू. हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून, यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
आता भारतीय अन्न महामंडळाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात आणि ग्रामस्थांना किड्यांच्या उपद्रवातून कधी दिलासा मिळतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









