
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कुडाळ : प्रतिनिधी
सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणारे पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलाने आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. या कामासाठी तलाठी खेताडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २३ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला. रेल्वे ब्रिजजवळ लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उप अधीक्षक श्रीम. संगिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक दिपक माळी, पोलीस हवालदार प्रीतम कदम, महेश जगताप, नागेश खोत, योगेश मुंढे, भूषण नाईक आणि स्वाती राऊळ यांनी सहभाग घेतला.







