ठळक घडामोडी

दामिनी पालव खून प्रकरणात साहिल धुरीच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ!

वर्दे खून प्रकरणाचा कुडाळ पोलीसांकडून तपास सुरूच

कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथील दामिनी किरण पालव (वय २३) हिच्या खून प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२, मठ ता.वेंगुर्ले) याची सात दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज शनिवारी पुन्हा अधिक तपासासाठी कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कुडाळ न्यायालयाने त्याला आणखी चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली असल्याची माहीती कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.
      मागील शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही खूनाची घटना वर्दे येथील सायल्याचा ओहळानजिक घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी साहील धुरीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ पोलिसानी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २४ ऑक्टोबर पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या कोठडीची मुदत संपताच पोलिसानी आज त्याला येथील न्यायालयासमोर हजर केले.
      दरम्यान, यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी आतापर्यंत संशयित आरोपीकडून खूनासाठी वापरलेला सुरा, कपडे, मोबाईल आणि गुन्ह्यांत वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ न्यायालयाला दिली. तसेच या प्रकरणात अधिक चौकशी आवश्यक असून त्यामुळे वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावेळी कुडाळ न्यायालयाने पोलीस प्रशासनाने केलेली मागणी मान्य करीत आणखी चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.

error: Content is protected !!