
सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन
२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह
कुडाळ : प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने हे आवाहन करण्यात आले असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीविरोधात पुढे येऊन निर्भयपणे विभागाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
टोल फ्री क्रमांक: १०६४
कार्यालयीन व्हाट्सॲप क्रमांक: ९९२२८९१०६४
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: ०२३६२-२२२२८९
भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. “लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका” असा संदेश यामध्ये देण्यात आला आहे. यंदा भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या वर्षीची संकल्पना “सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे” अशी आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे मूल्य जोपासत भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गमार्फत करण्यात आले आहे.





