
घरे, दुकानावरील छप्परे उडाली; भातशेतीचेही नुकसान
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीसहित नागरिकांच्या घरे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या वादळात वीजवाहिन्या आणि पोलांवर झाडे पडून वीजसेवा विस्कळीत झाली. गावात जाणाऱ्या रस्त्यांवर झाडे कोसळून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली. तर काही घरे आणि दुकानावरील छप्परे वाऱ्यामुळे उडून मोठे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यातील हिर्लोक पंचक्रोशीत काल शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गुरुनाथ तेली (किराणा दुकान), संतोष तांबे (कृषी केंद्र), रामदास परब (गॅरेज), दीपक चव्हाण (सलून) यांचे आणि भातशेती नुकसान झाल्याची माहिती हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे यांनी दिली.







