ठळक घडामोडी

अपहरण व धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार आरोपी पुण्यातून जेरबंद!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी

संशयित आरोपी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू

सिंधुदुर्ग : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातील मोशी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली.
       कुडाळ पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २४७/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित विलास वसेकर याचा पोलिस शोध घेत होते. गुन्हा घडल्यापासून तो स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित आरोपीचा सातत्याने शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, तो पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात एका कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पथकाने त्याचा माग काढला. तो मोशी येथे मिळून आल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.
     संशयित आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती पोलीसांकडून देण्यात आली.
     संशयित आरोपीविरुद्ध अन्य तीन गुन्हे दाखल
      विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-ब, ३५४-अ यांसारख्या कलमांखाली एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि प्रथमेश कदम यांचा समावेश होता.

error: Content is protected !!