
सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (रत्नागिरी) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीकरिता साप्ताहिक कृषी सल्ला जाहीर केला आहे. जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुढील १ दिवसात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह होणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
या साप्ताहिक कृषी सल्ल्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
खरीप भात पिकाचे व्यवस्थापन
तयार झालेल्या हळव्या भात पिकाची कापणी ९० टक्के दाणे पिकल्यावर जमिनीलगत सकाळच्या वेळी ‘वैभव’ विळ्याने करावी. पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकाची नासाडी होऊ नये म्हणून जेवढ्या भाताची झोडणी करणे शक्य आहे तेवढीच कापणी करावी आणि धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे. भात कापून कोणत्याही परिस्थितीत शेतात ठेवू नये.
गरव्या भात पिकाची काळजी
निमगरव्या व गरव्या भात जाती सध्या दाणे भरण्याच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी आणि पर्णरंध्रे बंद करून सांद्रीभवनाचा वेग कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) विद्राव्य खताची १ टक्के (१० ग्रॅम प्रति १ लिटर पाणी) फवारणी करावी. गरज भासल्यास विहीर, नदी किंवा नाल्यांतून संरक्षित पाणी द्यावे.
आंबा व काजू बागांचे नियोजन
ढगाळ व दमट वातावरणामुळे आंब्यावरील तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी २.८ टक्के प्रवाही डेल्टामेथ्रिन (९मिली प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी. तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास किडग्रस्त शेंडे नष्ट करून लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के प्रवाही (६ मिली) किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही (२५ मिली) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काजूवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात स्टीकर/स्प्रेडरचा वापर करावा आणि पावसाची किमान ५ ते ६ तासांची उघडीप पाहून सकाळी फवारणी करावी.
रब्बी हंगामातील पिके (कुळीथ व वाल)
हळव्या भाताची काढणी पूर्ण झालेल्या क्षेत्रातील जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कुळीथ आणि कडवा वाल या पिकांची शून्य मशागत (विनामशागत) पद्धतीने किंवा कमीत कमी मशागत करून त्वरित पेरणी करावी. तण नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तणनाशकांचा शिफारसीनुसार वापर करावा.
इतर पिके व भाजीपाला
शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या भुईमुगावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास डायमिथोएट (१० मिली प्रति १० ली.) आणि टिक्का रोगासाठी कार्बेडॅझिम (१० ग्रॅम) ची फवारणी करावी. कमाल वाढीच्या अवस्थेत असलेल्या ऊस व हळद पिकाला पाण्याची उपलब्धता असल्यास गरजेनुसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या झेंडू, वेलवर्गीय व फळभाज्यांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी.
पशुधन व कुक्कुटपालन सल्ला
सोसाट्याचा वारा आणि विजांच्या लखलखाटाची शक्यता पाहता, जनावरांना उघड्यावर किंवा झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यामध्ये बांधावे. वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊन कुक्कुटपालन शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची भांडी वाढवावीत आणि शेडला बाहेरून कापडी पडदे लावावेत.
मेघगर्जनेच्या वेळी घ्यावयाची काळजी
विजांचा लखलखाट व मेघगर्जनेचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने विकसित केलेले ‘दामिनी’ ऍप वापरावे. शेतात असताना निवारा न मिळाल्यास उंच वस्तू किंवा झाडांचा आसरा न घेता उघड्यावर शरीराचा आकार लहान करून (दबा धरून) बसावे. विद्युत उपकरणे, ट्रॅक्टर व धातूच्या शेती उपकरणांपासून लांब राहावे.

