
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विविध फलोत्पादनविषयक घटकांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत रोपवाटिका स्थापना, फळपिकांच्या क्षेत्राचा विस्तार, अळिंबी उत्पादन प्रकल्प, पुष्पोत्पादन, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड, सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, हरितगृह व शेडनेटगृह उभारणी, प्लास्टिक मल्चिंग, फळांना व फळांच्या घडांना आवरण घालणे, तण नियंत्रक आच्छादन तसेच मधुमक्षिकापालन अशा विविध घटकांसाठी लाभ देण्यात येणार आहे.
फळपिकांच्या क्षेत्र विस्तारामध्ये स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, ॲव्होकॅडो, केळी, अननस व पपई यांसारख्या पिकांचा समावेश आहे. याशिवाय फलोत्पादन यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर व पीक संरक्षण उपकरणे तसेच फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आणि रायपनिंग चेंबर यांसारख्या सुविधांसाठीही योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वानुसार करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याचे संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष स्थळ तपासणी (मोका तपासणी) करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. यापूर्वी संबंधित घटकांसाठी अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
योजनेचे घटक, पात्रता, अटी व शर्ती याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित गावातील उपकृषी अधिकारी अथवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

