ठळक घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रणालीचा शुभारंभ

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहीती

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करत Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत लाभार्थींना अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
     राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला.
     या उपक्रमामुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक व मच्छीमार संस्थांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपलब्ध शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार असून, विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहेत. तसेच योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-सिडिंग खात्यात जमा होणार आहे. सुलभ प्रक्रिया, कमी कागदपत्रे, जलद सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे मत्स्यव्यवसायिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. या लाभार्थीभिमुख उपक्रमासाठी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी :
https://mahadbt2.maharashtra.gov.in/ असेही आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!