ठळक घडामोडी

कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्टचे उद्घाटन!

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची उपस्थिती

नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कुडाळ पोलीस स्टेशनचा उपक्रम

कुडाळ : नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती मिळावी, तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक, बनावट लिंक, OTP फसवणूक, UPI फसवणूक, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि इतर सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने कुडाळ पोलीस स्टेशन येथे सायबर जनजागृती टेन्ट उभारण्यात आला आहे.
     कुडाळ पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणी दरम्यान या सायबर जनजागृती टेन्ट नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या हस्ते आज करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, फसवणुकीच्या विविध पद्धती, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास करावयाची तातडीची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल बँकिंग, ऑनलाइन खरेदी, UPI व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करू नये, याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
     सायबर जनजागृती टेन्टच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनी सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांची डिजिटल सुरक्षितता जपावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 या राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. त्वरित तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते; मात्र रक्कम परत मिळण्याची हमी नसते. कुडाळ पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सायबर जनजागृती टेन्टला भेट देऊन सायबर सुरक्षेबाबत माहिती घ्यावी, ती आपल्या कुटुंबीयांपर्यंत व परिचितांपर्यंत पोहोचवावी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह कुडाळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!