
मालवण : प्रतिनिधी
कोळंब कातवड येथील संजय रमेश कडू (वय ५१) यांनी काल बुधवारी रात्री १२.२४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कडू यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय होता.
याबाबत निलेश पराडकर यांनी पोलीसात दिलेल्या माहितीनुसार संजय रमेश कडू यांनी राहत्या घरातील हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गळफासातून खाली उतरून ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले. संजय कडू आपल्या परिवारासह कातवड येथील निवासस्थानी राहत होता. काल रात्री पत्नी त्यांची घरातच होती. संजय यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती देत पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येत मृतदेह गळफासमधून खाली उतरून विच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रूग्णालयात आणला होता. आज सकाळी विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संजय कडू हे शहरातून पर्यटन व्यावसायिकांकडून लॉण्ड्रीसाठी कपडे घेऊन कातवड येथे आपला व्यवसाय करत होते. परोपकारी आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. बाबा परब मित्रमंडळाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. कोळंब खडवणनाका येथीलही कार्यक्रमात ते सहभागी होत असत. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते. कडू यांच्यामागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.








